लॉकडाऊनचे निर्बंध शिथल होताच पुण्यात चिकन-मटणचे दर घसरले

पुणे वृत्तसंस्था । लॉकडाऊनचे निर्बंध राज्यभरात टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात मटण आणि चिकनचे दरही आवाक्यात आले आहेत. त्यामुळे मांसाहारींच्या खरेदी करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

पुण्यात मटणाच्या दरात ६० रुपये तर चिकनच्या दरात प्रति किलो ४० रुपये घट झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ७०० रुपये प्रतिकिलो असणारे मटण आता ६४० रुपये किलोवर आलं आहे. तर चिकनचे दर २८० वरुन २४० झाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कोंबडी, बोकड आणि मेंढीची कमतरता होती. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा मुबलक प्रमाणात मटण उपलब्ध आहे. त्यामुळे मांसप्रेमी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मटण खरेदीसाठी पुण्यात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. पावसाळी वातावरण असल्याने रविवारचा दिवस साधून नॉनव्हेजवर ताव मारण्याचा अनेकांचा बेत आहे. दरम्यान, मांस विक्रेत्यांना सर्व नियम पाळून विक्री करणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणाऱ्या ग्राहकांनाच मटण, चिकन विक्री केली जात आहे.

Protected Content