मुंबई (वृत्तसंस्था) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याआधी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक आणि ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आतापर्यंत राज ठाकरेंच्या एकूण ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्याचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कोरोनाबाधित तीन सुरक्षा रक्षक करोनामुक्त झाले आहेत.