पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्व कामकाज ठप्प आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पीसीएनटीडीतर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसह राज्याच्या अर्थचक्राबाबत भाष्य केले. पवार म्हणाले की, राज्यांतील जनतेसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार आहे. गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात निर्णय होणार आहे. मध्यंतरी 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले. पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पाहायला मिळाले. गरीब जनतेला ही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. दरम्यान, लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.