राज्यात हिवतापाचे ७९०८ रुग्ण तर डेंग्यूचे २५५४ रुग्ण

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात २१ जानेवारी ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत  हिवतापाचे ७९०८ रुग्ण तर डेंग्यूचे २५५४ रुग्ण आढळून आले आहेत.

 

आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. चिकनगुनियाचे ९२८ रुग्ण आढळले असून डास निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे.

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गुंतलेल्या आरोग्य विभागाला मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंग्यूचा सामनाही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.

 

 

कोरोनासोबत आता डास निर्मूलन हे एक मोठे आव्हान राज्यातील पूरस्थितीमुळे नव्याने निर्माण झाले आहे. किटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक जनजागृतीसह वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. २० ऑगस्ट हा जागतिक ‘डास दिवस’ मानला जातो. डॉ. रोनाल्ड रॉस यांनी २० ऑगस्ट १८९७ रोजी हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हिवताप संवेदनशील अशा ठाणे, रायगड, गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यातील ११८८ गावात घरोघरी जाऊन किटकनाशकाची पहिली फवारणी केली. राज्यातील दहा जिल्ह्यात साडेचार लाख किटकनाशकभारित मच्छरदाण्यांचे वाटप पूर्ण केले.

 

आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जानेवारीपासूनच हिवताप संवेदनशील जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन पाणीसाठवणूक व्यवस्थेची तपासणी सुरु केली. जवळपास साडेचार लाखांहून अधिक घरे आणि पाणी साठवण्याच्या साडेपाच लाख स्थानांची तपासणी करण्यात आली आहे. जवळपास सव्वा लाखाहून अधिक ठिकाणी डासांची अळीनाशके टाकण्यात आली आहेत. जगभरात डासांच्या जवळपास साडेतीन हजार प्रजाती असून यातील अनोफेलिस डासांपासून हिवताप, कुलेक्स डासांपासून हत्तीरोग व जपानी मेंदूज्वर तर एडिस डासापासून झिका व चिकनगुनिया हा विकार होतो. राज्यातील पाणी साठ्यांच्या ठिकाणी डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी औषध फवारणी बरोबर गप्पी मासेही सोडण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१९ व २० मध्ये राज्यात हिवतापाचे साडेदहा हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते तर यंदा आठ महिन्यात साडेसात हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मागील दोन वर्षात डेंग्यूचे रुग्ण १५ हजारांच्या आसपास होते. यंदा २५४४ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. चिकनगुनियाचे रुग्ण मागील दोन वर्षाच्या तुलनेत कमी आढळले असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांत चिकनगुनियाचे सव्वापाच हजाराच्या आसपास रुग्ण होते. यंदा आतापर्यंत ९२८ रुग्ण आढळून आले आहेत.

 

या पार्श्वभूमीवर मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण जास्त नसले तरी ४० हजाराहून अधिक ठिकाणी डेंग्यू व आठ हजार ठिकाणी मलेरिया पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

 

मुंबई महापालिकेनेही जानेवारीपासून घरोघरी जाऊन यासाठी आरोग्य तपासणी सुरु केली आहे. आरोग्य विभागाने सर्वच महापालिकांना याबाबत सतर्क राहून डास निर्मूलन मोहीम राबविण्यास सांगितले आहे.

 

Protected Content