धनंजय मुंडे म्हणतात, पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच !

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी तिन्ही घटकपक्षांमधील सुप्त स्पर्धा कुणापासून लपून राहिलेली नाही. यातच तिन्ही पक्षांचे नेते अनेकदा एकमेकांना सूचक पध्दतीने डिवचत असल्याचेही अनेकदा अधोरेखीत झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

सातार्‍यातील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचं काम मी केलं. आज शब्द देतोय.. सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून.. येणार्‍या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील  ते आपलेच असतील’ असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मनसेचे नेते गजानन काळे यांनीही मुंडेंच्या वक्तव्यावर म्हटले की, पुढचा मुख्यमत्री राष्ट्रवादीचा असेल तर संजय राऊत व त्यांच्या सेनेनं काय धुणी भांडी कारयची का तुमची? हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. तो सहन केला जाणार नाही. उद्या खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळासह टोमणे अग्रलेख वाचा. अशा शब्दात गजानन काळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!