राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे — चंद्रकांत पाटील

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

“अजित पवारांना राज्यात कोरोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घऱी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

“अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहे. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,” असा टोला  त्यांनी लगावला.

 

पुढे   ते म्हणाले की, ”मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी अभ्यास कऱणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री ,  येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री”.

 

“त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असतं. ते आम्हालाही लागू पडेल. माणसाने नेहमी नम्र राहायचं असतं. नीट बोलायचं असतं. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होतं असं मान्य कराल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Protected Content