राज्यात लसींचा पुरेसा साठा : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकार लस नसल्याचा कांगावा करत नसले तरी राज्यात लसींचा पुरेसा साठा असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले आहे. शिवाय, आम्ही केंद्राकडे लशींसाठी मागणी केलेली असल्याचंही ते म्हणाले होते. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की, किमान महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही महाराष्ट्राला अजून लस हवी आणि ती मिळत नाही, असा कांगावा महाविकास आघाडीने सुरू केलाय. झखइ ने याबाबत सत्य स्पष्ट करणारी माहिती दिली त्यानुसार महाराष्ट्राकडे कोव्हिशिल्ड लसीच्या सुमारे सव्वा कोटी व कोव्हॅक्सिनच्या ३० लाखांहून अधिक मात्रा आहेत. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. १५ -१८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा डोस यासाठी कोव्हॅक्सिन २.९४ लाख तर कोव्हिशील्ड रोज ३.५७ लाखाचे आकडे कोविन डॅशबोर्डवरही दिसताहेत. म्हणजेच महिनाभर पुरेल इतका लससाठा महाराष्ट्राकडे असल्याचं स्पष्ट आहे. आजही (१४ जाने) महाराष्ट्राला ६.३५ लाख कोव्हॅक्सिन देण्यात आल्यात. अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

याचबरोबर, महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही आणखी लस मागणं आणि ती मिळत नाही म्हणून गळे काढण्यातून साध्य काय होईल? असं राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे महाविकास आघाडीने एकदा तपासून घ्यावं. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिवाय त्यांनी आपल्या ट्विटबरोबर पीआयबीची बातमी देखील जोडली आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुरेसे लसींचा साठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

Protected Content