राज्यात दोन मुख्यमंत्री, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरताय : चंद्रकांत पाटील

पुणे (वृत्तसंस्था) सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्यातील काम पाहत आहेत. यासोबतच कोरोनाचाही आढावा घेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यभर दौरे करत आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा असे थेट आव्हानच विरोधीपक्षाला दिले होते. त्यांच्या याच आव्हानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक म्हणजे जे मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे म्हणजे जे राज्यभर फिरत आहेत, असे म्हणत पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सातवीच्या मुलालाही निबंध लिहायला सांगितला तर तो लिहिल. केवळ कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही असे ते म्हणतात. परंतु तिघेही भांडत असतात आणि नंतर काहीही झाले नाही असे म्हणतात, असेही ते म्हणाले. कोंबड झाकून ठेवले तरी तरी सूर्य उगवायचा राहत नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content