जय गणेश फाउंडेशनचा गणेशोत्सव यंदा ’मानवी जीवनाचा मदतोत्सव ‘

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी गणेशोत्सव आगळा वेगळा ‘मानवी जीवनाचा मदतोत्सव’ साजरा करण्याचे शहरातील जय गणेश फाउंडेशनने ठरवले आहे.

जय गणेश फाउंडेशन चा सांस्कृतिक गणेशोत्सव ‘ नवसाचा गणपती ‘ हा संपूर्ण भुसावळ शहर व परिसरात प्रसिद्ध आहे. परंतु, ह्या वर्षी सर्वत्र कोरोना महामारीने हाहा:कार माजवला असल्याने यंदाचा गणेशोत्सव ‘मानवी जीवनाचा मदतोत्सव ‘साजरा करण्याचे वार्षिक सभेत ठरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार निवडक पदाधिकारी प्रत्यक्ष बैठकीत उपस्थित होते तर बाकीचे सभासद झूम ऍप द्वारे सहभागी झालेले होते. अध्यक्षस्थानी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे होते. सुरुवातीला जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक तथा रोटरी चे माजी अध्यक्ष अरुण मांडळकर यांनी मागील वर्षभरात घेतलेले विविध उपक्रम व कोरोना लॉकडाऊन काळात संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सांगितली. दरवर्षी प्रमाणे यंदा श्री गणेशाची स्थापना व विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंडळातर्फे दरवर्षी मूर्ती लहानच स्थापन करण्यात येते. त्याचप्रमाणे संपूर्ण गणेशोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची पर्वणी भक्तांना उपलब्ध करून दिली जाते. त्यात खंड न पडू देता मदतोत्सवाद्वारे गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. यात लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या गोर गरिबांना धान्य व किराणा वाटप करणे, कोरोनामुळे बळी गेलेल्या गरीब कुटुंबातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेणे, भुसावळ तालुक्यातील काही खेड्यांमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपद्वारे शिक्षणोत्सव साजरा करणे, परिसरात मोठी झाडे लावून त्यांची संगोपनाची जबाबदारी घेऊन वृक्षोत्सव साजरा करणे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, ऑनलाईन भजन स्पर्धा घेणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार असून शहरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार असल्याचे यावेळी उमेश नेमाडे यांनी सांगितले. सुरभि नगरातील नवसाचा गणपती मंदिरात ह्या वर्षी ‘श्रीं’ची स्थापना करण्याचे ठरले. जय गणेश फाउंडेशन चे विद्यमान अध्यक्ष धिरज धांडे, मंदिराचे विश्वस्त सुधीर देशपांडे, प्रकाश चौधरी, क्रीडा विभागाचे कार्याध्यक्ष चैत्राम पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक सदस्य दिनेश शर्मा , कारगिल दिनानिमित्त शहिदांना तसेच शहरातील कोरोना बळी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फाउंडेशन चे समन्वयक गणेश फेगडे यांनी तर आभार सचिव तुषार झांबरे यांनी मांडले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, सोनार, फाउंडेशन उपाध्यक्ष राहुल भावसेकर, प्रविण पाटील, अतुल पाटील, सुमित यावलकर, हर्षल वानखेडे, पूजन महाजन, लोकेश वाढे,अरविंद बोंडे, प्रकाश ब-हाटे, वृंदेश शर्मा, करण जाधव , मनोज चौधरी आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content