अचूक नियोजनातून विकासाला गती द्या : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव  प्रतिनिधी- ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती असून यात जनहिताच्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अपडेट रहावे. तसेच अचूक नियोजनातून तालुक्याच्या विकासाला गती द्यावी अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिल्या.

पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमिवर घेतलेल्या या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेत, चांगले काम करणांचे कौतुक करत, दिरंगाई करणार्‍यांना खडसावले. पंचायत राज समितीचा दौरा हा प्रशासकीय कामांना गती देणारा व विकासासाठी महत्वाचा ठरणारा असेल असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.

जिल्ह्यात लवकरच पंचायतराज समिती येत असून याच्या पार्श्‍वभूमिवर, आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यात ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनीक बांधकाम खाते आदी विविध विभागांमधील सद्यस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्‍यांनी नमूना क्रमांक १ ते ३३ ची अद्ययावत नोंद ठेवावी. ग्रामपंचायतीत दिव्यांगासाठीचा ५ टक्के; मागासवर्गियांसाठी १५ टक्के आणि महिला व बालविकाससाठी १० टक्के राखीव असलेला निधी खर्च झाला की नाही ? याची माहिती त्यांनी जाणून घेतली. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगातून प्रत्येक गावाला मिळालेला निधी आणि याचा विनियोग याबाबतची माहिती सात दिवसात अपडेट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर, प्रत्येक कामाचे बोर्ड हे ठळकपणे दिसतील असे लावण्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमधील पाणी पुरवठा योजनांची वीज बील थकीत असल्यास ते तातडीने अदा करून टिसीएल पावडर टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. तर प्रत्येक गावात स्वच्छता मोहिम आणि जनजागृती राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात.

स्वच्छता मिशनच्या अंतर्गत तालुक्यातील सार्वजनीक आणि खासजी शौचालये यांची माहिती देण्यासह घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाच्या कृती आराखडे तात्काळ तयार करण्यात यावेत अशा सूचना ना. गुलाबराव पाटलांनी दिल्यात. शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १६ कलमी कार्यक्रम राबवा आणि पाण्याची सुविधा नसलेल्या दोन शाळांमध्ये तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. तर शाळा खोल्यांबाबतची माहिती अद्ययावत ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.

सिंचन विभागातातर्फे साठवण बंधारे आणि सिमेंट नाला बांध याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात येऊन सार्वजीनक बांधकाम खात्याकडून ५०५४, ३०५४, २०१५ आणि नाबार्ड आदी विविध योजनांमधून झालेल्या कामांची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.                                .  .

हे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे पाळकमंत्र्यांचे निर्देश !      

ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी विविध कामांना गती देण्याचे सूचित केले. यात प्रामुख्याने पंचायत समिती येथे अद्यावत सभागृह बांधकाम, पाळधी येथील रेल्वेवर उड्डाण पूल, धरणगावात सा. बा. विभागाचे शासकीय विश्रामगृह, नगरोत्थान योजतेतून धरणगावातील बस स्थानक परिसराचे सुशोभीकरण,  तालुक्यातील पर्यटन अंतर्गत वाघळूद बुद्रुक येथील विठ्ठल मंदिर, निशाणे येथील महालक्ष्मी मंदिर आणि भोणे येथील मंदिर या तीर्थक्षेत्रांचा पर्यटनातून विकास करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तर पाळधी येथील श्री साई मंदिराच्या बाजूला कायमस्वरूपी हेलीपॅड उभारण्याचा व आरोग्या खात्याने नांदेड, चांदसर, दोनगाव व साळवा उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे प्रस्ताव देखील सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

सध्या साथीच्या रोगांची शक्यता लक्षात घेऊन आशा वर्कर आणि अंगणवाडी स्वयंसेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सर्वांना औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या. तालुक्यातील सुमारे ४० हजार लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला तर १५ हजार लोकांनी दुसरा डोस घेतला असून लसीकरणासाठी कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहण्याच्या सूचना देखील दिल्या.

दरम्यान, लोकशाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेच्या अंतर्गत जनजागृतीस प्रारंभ केला असून आजपासून धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेशी संबंधीत जनजागृती करणार आहे. या मोहिमेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

बैठकीला सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे ,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, पी. एम. पाटील, तहसीलदार नितीनकुमार देवरे, गट विकास अधिकारी स्नेहल कुडचे , सहायक प्रशासन अधिकारी अनिता सोनवणे, सहायक बी डी ओ हेमंत देशमुख , दिपक सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सोनवणे, गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी,कृषी, एम.एस.ई.बी. व जि.प. बांधकाम , सा. बा . विभागाचे चे अधिकारी , ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्रीमतीएस. बी.कुडचे यांनी केले . सुत्रसंचालन  ग्रामविकास संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी केले. आभार सभापती प्रेमराज पाटील यांनी मानले.

 

 

 

 

Protected Content