राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही असं त्यांनी   सांगितलं आहे.

 

“राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही,” असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

 

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार  वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून  परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

 

राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या  परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला होता. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. या आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.

 

यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीची, तर १३ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाच्या परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या त्या-त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच परीक्षा घेण्यात येणार होत्या. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक साहित्यही पाठविण्यात आले होते. मात्र राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

दहावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Protected Content