देशातील दडपशाही संपेपर्यंत मी थांबणार नाही – अभिनेता कमल हासन

kamal haasan

चेन्नई वृत्तसंस्था । ‘दस्तऐवजांच्या आधारावर किंवा त्याअभावी आपण एखाद्या व्यक्तीचे देशातील अस्तित्व सिद्ध करू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही. देशातील ही दडपशाही संपेपर्यंत मी थांबणार नाही’. अशा शब्दात अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी पुन्हा एकदा नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलन पेटलं असताना बॉलिवूडचे कलाकारदेखील या कायद्याविरोधात आपली मतं मांडताना दिसत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. ‘संसदेत बहुमत मिळवले म्हणजे आपल्या देशाची सामाजिक घडी विस्कटविण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असं समजू नका. नागरिकत्व कायद्यानंतर आता ‘एनआरसी’चे भूत त्यांच्या डोक्यात आहे, असे सांगून त्यांनी सरकारी धोरणाचा निषेध केला आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अभिनेते कमल हासन यांनी जोरदार निषेध केला होता. ‘विद्यार्थ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर म्हणजे लोकशाहीच्या तोंडात मारण्यासारखं असून त्यामुळं लोकशाही ‘आयसीयू’त असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे,’ अशी तोफ त्यांनी डागली होती.

Protected Content