राज्यस्तरीय फुले-आंबेडकर शिक्षक संमेलन : अध्यक्षपदी डॉ. मिलिंद बागूल तर उद्घाटकपदी उत्तम कांबळे यांची निवड

जळगाव, प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त पहिले फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मिलिंद बागूल तर उद्घाटकपदी  प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांची निवड शिक्षक आकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर अमृतसागर यांनी कळविले आहे.

 

इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह गरुड वाचनालयाजवळ धुळे येथे फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलनाचे शनिवार दि. २५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.  या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी साहित्यिक असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. मिलिंद विनायक बागूल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे संदर्भ माझ्या जातीचे(कवितासंग्रह), कथाशील (कथासंग्रह), शंकराव खरात कथात्म वांग्मय, फ.मु. गजबजलेलं गाव, हमालपुरा ते कुलगुरू ही पुस्तके प्रसिद्ध असून अनेक विद्यापीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी रामचंद्र जाधव आहेत.प्रमुख अतिथी प्रा.डॉ.गंगाधर अहिरे उपस्थित राहणार आहेत. चार सत्रात होणाऱ्या या संमेलनाच्या समारोप समारंभात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आणि प्रसिद्ध विचारवंत श्रावण देवरे उपस्थित राहणार असून याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीचे अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक भास्‍कर अमृतसागर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

 

Protected Content