मुंबई : वृत्तसंस्था । “तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी टीका शरद पवार यांनी राज्यपालावर केली .
“राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं.” असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने जमलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित केलं.
यानंतर हे आंदोलक शेतकरी राज्यपालांना भेटून निवदेन देण्यासाठी राजभवनाकडे निघाले होते, मात्र त्यांना वाटेतच पोलिसांकडून अडवण्यात आलं. शिवाय, राज्यपाल देखील राजभवानात उपस्थित नसल्याचे समोर आल्याने, आंदोलक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व शेतकऱ्यांनी याचा जोरदार निषेध करत, घोषणाबाजी सुरू केली. अखेर, राज्यपालांना द्यायचे निवदेन शेतकरी नेत्यांना फाडून टाकले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. तर, राज्यपालांची भेट घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत, असा आंदोलक शेतकऱ्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी पवित्रा घेतला होता.