राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री ठाकरेंना विधानपरिषदेचं सदस्यत्व

मुंबई, प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका कोरोना संकटामुळं पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेचं सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही विनंती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावरील कोरोना विषाणूचं संकट अधिक गहिरं होत गेल्यानं विधानपरिषदेच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरील संकट जवळजवळ टळलं आहे. राज्यघटनेतील कलम १६४ (४) अन्वये, मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यास, त्यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणं अनिवार्य असतं. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हे पद कायम राखण्यासाठी २८ मे अगोदर त्यांना विधीमंडळाच्या सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, ‘राज्यपाल नियुक्त रिक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड १९च्या संकटकाळात राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ शकत नाहीत. संवैधानिक संकट टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे,’

राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त
राज्यात राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यातील एका जागेसाठी मंत्रिमंडळानं उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. जर राज्यपालांनी सहमती दर्शवली तर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यात यशस्वी होऊ शकतात.

Protected Content