मुंबई प्रतिनिधी । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अजूनही भाजप कार्यकर्त्याच्या मानसिकतेत असल्याने ते परस्पर कोरोना बाबत प्रशासकीय यंत्रणा राबवत असल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात राज्यपालांवर टीकास्त्र सोडण्यात आले. यात म्हटले आहे की, कोरोनाबरोबरच्या लढाईत आपले योगदान हवे असे सगळयांनाच वाटते. मग आमच्या राज्यपालांना तसे वाटले व त्यांनी राजभवनात बसून काही कार्य केले तर बिघडले कुठे? आम्ही म्हणतो करू द्या. राज्यपालांनी कोरोनासंदर्भात राजभवनात बसून प्रशासकीय यंत्रणा राबविली (परस्पर) म्हणून टीकेचा सूर उठला आहे. दिल्लीत पंतप्रधान व राज्यात मुख्यमंत्री यांनीच प्रशासनास सूचना द्याव्यात. दुसरे कोणी परस्पर, समांतर सरकार चालवत असेल तर गोंधळाचे वातावरण निर्माण होईल असे श्री. पवारांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यास वाटत असेल तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे. आपल्या राज्यपालांना कामाची आवड आहे. ते आज राजभवनात आले असले तरी कालपर्यंत ते संघाचे प्रचारक आणि भाजपचे कार्यकर्तेच होते. त्यामुळे आजही ते कदाचित कार्यकर्त्याच्याच मानसिकतेत असावेत. वेळकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी सोहळयाने महाराष्ट्राने अनुभवले असल्याचा टोला यात मारण्यात आला आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत, तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. मात्र विरोधी पक्षाची जास्त ऊठबस राजभवनावर सुरू आहे. अर्थात, हीच आपली लोकशाही आहे. खरे तर, महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारी, स्वत: विरोधी पक्षनेते यांनी गोळा केलेला त्यांचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याऐवजी थेट दिल्लीस वळवला. अर्थात, ही त्यांची मानसिकता असली तरी मुख्यमंत्री आणि सहकार्यांनी या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. कारण पंतप्रधान, गृहमंत्री महाराष्ट्राला जी मदत हवी आहे ती द्यायला तयार आहेत. महाराष्ट्राच्या राजभवनातील प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राहावे असे वाटणार्यांपैकी आम्ही एक आहोत. राज्यपाल हे घटनेचे पालन करणारे आहेत. कालच्या पहाटे काय झाले तो विषय चघळत न बसता आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहतो. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संसदीय क्षेत्राचा त्यांचा अनुभव आणि व्यासंग मोठा आहे. त्यांच्याही भावना महाराष्ट्राचे राज्यपाल समजून घेतील. राजभवनाची लढाई हा आमच्यासाठी तरी मुद्दा नाही. आज सगळ्यांचे प्राधान्य कोरोनाविरुद्धच्या लढाईला असायला हवे. कोरोनाविरुद्ध सगळयांनाच लढायचे आहे. कोरोनाला संपवायचे आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हे कार्य सिद्धीस नेणे हीच काळाची गरज असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००