मुक्ताईनगर येथे कोरोना संदर्भात पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संयुक्त पथकाद्वारे मुक्ताईनगर येथील पोलिस विभागाचे कर्मचारी आणि नगरपंचायतचे कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दौलत निमसे व त्यांचे पथक या ठिकाणी येऊन त्यांनी हे मार्गदर्शन आणि तपासणी केली.

याप्रसंगी तहसीलदार शाम वाडकर, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, पोउनि निलेश सोळुंके हे प्रमुख उपस्थित होते. डॉ. निमसे यांनी कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच प्रतिबंधात्मक उपाय यासंदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. पोलीस विभाग हा रस्त्यावर उभे राहून सर्वसामान्यांची काळजी घेत असताना स्वतःची काळजी घेणे देखील आवश्यक असल्याने पोलिसांनी कर्तव्यानंतर घरी जाणे घरात जाण्यापुर्वी हात स्वच्छ धुणे, कपडे गरम पाण्यात भिजू घालुन आंघोळ करूनच घरात प्रवेश करणे यासारख्या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी ग्रामसुरक्षा दलातर्फे पाणी, चहा वाटप करण्यात आले. याप्रसंगी दिनेश कदम, सचिन जैन, राजू वंजारी हे उपस्थित होते.

Protected Content