मुंबई वृत्तसंस्था । विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा भरण्याच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकमताने मंजूर करून शिक्कामोर्तब करण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रस्ताव आला, तो एकमताने मंजूर झाला, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाईल. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकासआघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. यापैकी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशीत विधान परिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांची निवड झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय, मुजफ्फर हुसेन, रजनी पाटील आणि अनिरुद्ध वनकर यांनाही काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी कधी पाठवणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळी महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता. सध्याच्या १२ जागाही जून महिन्यात भरल्या जाणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. परंतु, यावेळी महाविकासआघाडीने १२ जागा भरायच्याच, खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण निर्माण होणार आहे.