राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जगाच्या पाठीवर भारत हाच असा देश आहे की, सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात. यात अनेक जाती, धर्म, पंथ आहे. देशात चारही बाजूला वेगवेगळे धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र आहेत. कुंभमेळा, चारधाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक दर्शन, साडेतीन शक्तीपीठ, सुवर्ण मंदिर, गुरुद्वारा, समुद्र तट, हिमालया सारखे पवित्र पर्वत अशा अनेक धार्मिक स्थळांनी नटलेली ही  भूमी  संतांची भूमी म्हणून जगतमान्य आहे. म्हणून या देशात राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे असे अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले.

 

ते येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आशीर्वचन देत होते. राजसत्ता जर धर्म सत्तेचा आदर करून काम करेल तर निश्चितच ते विश्वविख्यात होतील यात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य मिळवून दिले. त्यानी सुद्धा संत परंपरेचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर केला.  श्री राम जन्मभूमी भूमिपूजन समारोहाच्या वेळी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पण धर्म सत्तेला नतमस्तक होऊन जगाला धर्मसत्तेचे महत्व दाखवून दिले. आपल्या वाड वडिलांनी जे धर्माचे काम केले अशा श्रीमद् भागवत कथा सप्ताह, हरिनाम कीर्तन सप्ताह, प्रवचन व धार्मिक कार्यात नव्या पिढीने जोमाने काम करून धर्माने सांगितलेले नियम आचरणात आणून आपले जीवन जगावे असा मौलिक उपदेश त्यांनी दिला. युवा पिढीने जात पात, संप्रदाय, माझा समाज, हा माझा विभाग यात गुंतून न राहता संघटित होऊन, एकत्र येऊन काम करावे.आज लोकप्रतिनिधी एकमेकाबद्दल जी शब्दप्रयोग करित आहेत ते समाजाला आदर्शवत नाही. यामुळे येणारी जी भावी पीढ़ी आहे त्यांच्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आपण सम्माननीय लोकप्रतिधी आहोत याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे असा  उपदेश त्यांनी केला. यावेळी आमदार संजय भाऊ सावकारे यांनीही मनोगत व्यक्त केले. या सप्ताहात परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक भक्त, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Protected Content