


यवतमाळ प्रतिनिधी । राजकारण्यांनी इतर कामांमध्ये हस्तक्षेप करू नये असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना घरचा आहेर दिला. ते येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात बोलत होते.
यवतमाळ येथील ९२व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला नयनतारा सहगल यांना आमंत्रीत करण्यावरून वाद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, समारोपाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे. ते पुढे म्हणाले की, मतभिन्नाता असावी मात्र मनभिन्नता असू नये, आपल्याला विरोध करणार्याचाही सन्मानच केला पाहिजे. जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या मर्यांदा सांभाळून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे गडकरी म्हणाले.


