राऊतांची भूमिका श्रीराम मंदिराच्या विरोधी- शेलार

मुंबई प्रतिनिधी । आयुष्यभर ज्यांना महापालिकेतील कंत्राटदारांच्या जीवावर स्वतःचा पक्ष चालवण्याची सवय आहे, त्यांना राम भक्तांकडून जमा केलेल्या वर्गणीच्या आधारावर होणार्‍या राम मंदिराच्या कामात डोळेखुपी होणारच असा हल्लाबोल करत राऊतांची भूमिका ही श्रीराम मंदिराच्या विरोधी असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपच्या राम मंदिरासाठी वर्गणी जमा करण्याच्या मोहिमेबाबत टीका केली आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंगा आणायचा. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, अशा शब्दात शेलार यांनी टीका केली. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणार्‍यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे? असा सवालही शेलारांनी विचारला.

आयुष्यभर ज्यांना महापालिकेतील कंत्राटदारांच्या जीवावर स्वतःचा पक्ष चालवण्याची सवय आहे, त्यांना राम भक्तांकडून जमा केलेल्या वर्गणीच्या आधारावर होणार्‍या राम मंदिराच्या कामात डोळेखुपी होणारच. २०२४ च्या पराभवाची पायाभरणी संजय राऊत जाहीररित्या का मांडत आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

दरम्यान, राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधू ते कारसेवक, किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत. या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती, त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी झाली होती. त्यांनाच आता रामवर्गणी डोळ्यात खूपत आहे. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणार्‍यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे? असे ट्विट करून शेलार यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

Protected Content