जळगाव, प्रतिनिधी | शहरात नवीन रस्ते बनविण्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यांची काम गुणवत्तापूर्ण व्हावी अशी मागणी जळगावकर करत आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संयुक्त दौरा करून संबधितांना गुणवत्तापूर्ण काम करण्याची सूचना करत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे, बळकटीकरण आणि दुरूस्ती करण्याचे नियोजित करण्यात आली आहेत. या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. या कामांच्या गुणवत्ता व टिकाऊपणा याबाबत अतिशय काळजी घेऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यात गुणवत्ता नसेल तर रस्त्यांचे बरेच नुकसान होत असते. शहरातील वाढत्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. या करिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संयुक्त दौरा केला. या दौऱ्यात उच्च दर्जाचे रस्ते तयार करण्याबाबत संबधित यंत्रणेला जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सूचना दिल्या. जर या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी दिसून आली तर संबधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही श्री.राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी थर्ड पार्टी ऑडीट काम सुरु होण्यापूर्वी, काम चालू असतांना व काम झाल्यावर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. आवश्यकता पडल्यास काम झालेल्या रस्त्यांची त्रयस्त यंत्रणेकडून शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करत गुणवत्तेत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.