सावधान : शहरात वृध्द महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविण्याचे प्रमाण वाढले !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात फक्त गुन्हे दाखल करण्यात येत आहे. मात्र कारवाई शुन्य असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपुर्वी वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लांबविल्याची घटना ताजी असतांना महाबळ परिसरातील नूतनवर्षा कॉलनी येथे बाहेर कचरा फेकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र जबरी लांबविण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेले माहिती अशी की, प्रेमलता नारायण सोनवणे (वय-७०, रा. नूतन वर्षा कॉलनी, महाबळ, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ मे रोजी सकाळी १० वाजता प्रेमलता सोनवणे या वृद्ध महिला घरातील कचरा फेकण्यासाठी त्यांच्या घराजवळ असलेल्या कचराकुंडीकडे जात असतांना समोरून एक तरुण त्यांच्याजवळ आला. त्यानंतर त्याने वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत जबरी हिसकावून तोडून पसार झाला. वृध्द महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत संशयित आरोपी हा फरार झाला होता. या संदर्भात वृद्ध महिलेने १७ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Protected Content