जळगाव : प्रतिनिधी । चोपडा ते जळगाव या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार भाजप तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे
भाजप तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , चोपडा — जळगाव मार्गावरील आव्हाना ते वडनगरीपर्यंत एका बाजूने डांबरीकरण झाले आहे . हे काम पुढे सुरु असतानाच या ५ किमी अंतरात आताच १५ ठिकाणी खड्डे पडले आहेत ! यावरून कामाचा दर्जा लक्षात घ्यावा . दैनंदिन रहदारीचा विचार न करता हा रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवलेला आहे त्यामुळे कसरत करीत वाहने चालविली जात असली तरी अनेकदा अपघात होतात
हे काम करताना पाण्याचा पुरेसा वापर होत नाही असे सांगितले जात आहे . राऊत आणि सोनग्रा नावाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनसुद्धा फायदा झाला नसल्याने संबंधितांच्या अशा मनमानीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास आम्ही या खड्ड्यांची पूजा करून रस्त्याचे उदघाटन करू असा उपहासात्मक इशाराही भंगाळे यांनी दिला आहे
या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी , खासदार , केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान कार्यालयालाही पाठवल्याचे भंगाळे यांनी म्हटले आहे