जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांची कामे न करणाऱ्या मक्तेदारांची नावे काळ्या यादीत टाकून त्याच दरात दुसऱ्या मक्तेदाराकडून काम करून घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना बुधवारी २० जुलै रोजी दुपारी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समिती व महाविकास आघाडी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर निधी महापालिका प्रशासनाला देण्यात आला होता. या निधीतून शहरातील मुख्य रस्ते व इतर आवश्यक कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मुख्य रस्त्याचे कामे न करता अनावश्यक गल्लीतील व कमी प्रमाणात वाहतूक असलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येऊन वॉल कंपाऊंड, पेव्हर ब्लॉक, हायमस्ट लाईट या कामांचा भरना निधीतून कामे करण्याचा महानगरपालिका प्रशासनाने घाट घातला आहे. काही प्रमाणात रस्त्यांची कामे मक्तेदारांना देण्यात आलेली असताना कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. याकरिता महापौर यांच्यासह महानगर प्रशासन व मक्तेदार यांची संयुक्त बैठक बोलावून सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मक्तेदार यांना देण्यात यावे. अन्यथा मक्तेदारांना आर्थिक दंड करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्याच दरातील दुसऱ्या मक्तेदारास काम करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केली.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनील माळी, राजू मोरे, इब्राहिम तडवी, विशाल देशमुख, सुहास चौधरी, रहीम तडवी, संजय जाधव, किरण चव्हाण यांच्यासह आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.