योग समन्वय समितीतर्फे योग दिनानिमित्त राबविलेल्या विविध उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राज्यभर योग समन्वय समितीतर्फे जागतिक योग दिनानिमित्त विशेष कलाकृती स्पर्धा घेण्यात आली. ‘योगा विथ फॅमिली अर्थात पारिवारिक योग’ या विषयावर निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी सर्व समावेशक विशेष कलाकृती घेण्यात आले. तसेच आकाशवाणी, व्हिडीओ, वेबीनार व प्रश्नावलीच्या माध्यमातून योगाचे महत्व व होणारा लाभ याची माहिती पोहचविण्याचे काम योग समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.

व्हिडीओच्या माध्यमातून योगाची जनजागृती
योगाबाबत ही जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून अनेक जिल्ह्यात स्पर्धा घेऊन विषय पोहोचविणे सुरु झाले. अनेक ठिकाणी निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. योग समन्वय समितीतील सदस्यांनी मिळून समितीच्या नावाने २१ मिनिटांपर्यंतचा योग संदर्भातील व्हिडीओ तयार करून योग दिनच्या पुर्वसंध्येला प्रसारण करण्यात आले. यात ओमकार. पूरक हालचाली, आसन, प्राणायाम, ध्यान, योगिक आहार, निसर्गोपचार आणि शेवटी शंखनाद या सर्व आयामांचा समावेश होता. असा हा सर्वसमावेशक व्हिडीओ आयुष मंत्रालयाच्या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत समावेशित करण्यात आला. या व्हिडीओच्या माध्यमातून योगा संदर्भात जनजागृती करण्याचे काम करण्यात आले.

वेबिनार :
समिती मधील सदस्यांनी राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर वेबिनारचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख कृणाल महाजन यांनी विविध संस्थेंशी मिळून ‘सप्तचक्र एक आत्मिक अनुभव’ या विषयावर वेबिनार घेतले. समिती सदस्या स्मिता पिले यांनी अमेरिका तसेच भारतातील नागरिकांसाठी तीन दिवशीय योगशिबीर घेतले. समिती सदस्या दीपा लोढा यांनी आहार विषयक वेबिनारचे आयोजन केले होते. चित्रा महाजन यांनी निसर्गोपचार आणि योग यांचे समन्वय साधत व्याधीनुसार योगाभ्यास याविषयावर तर सीमा पाटील यांनी ३ ऑनलाईन वर्ग घेतले. सोनाली पाटील आणि पल्लवी उपासनी यांनी एकत्रित महिलांसाठी योगवर्ग घेतला. आणि प्रतिभा कोकंदे यांनी ध्यान आणि प्राणायाम याविषयावर राज्यस्तरीय वेबीनार घेऊन ५० लोकांना मार्गदर्शन केले.

संशयित कोरोना रूग्णांना दिले जाणार प्रात्यक्षिके
योगाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सोशल मीडियावर डिजीटल प्रश्नावली तयार करण्यात आली. या प्रश्नावली स्पर्धेसाठी एकुण १८५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. पहिल्या तीन दिवसात चांगला प्रतिसाद मिळाल्याने सात दिवसांपर्यंत प्रश्नावली स्पर्धा ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संशयित कोराना रूग्णांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योग समन्वय समितीच्या वतीने लवकरच शासनाच्या मदतीने प्राणायाम व आसनांची प्रात्यक्षिके देण्यात येणार आहे.

Protected Content