‘या’ ग्रामपंचायतीत साडेसहा लाखांचा भ्रष्टाचार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  निंभोरी बुद्रुक ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून गावांतर्गत पाणी पुरवठा योजना व देखभाल दुरुस्ती करण्याचा शासनाचा नियम असतांना सरपंच व ग्रामसेवकांने मनमानी कारभार करत शेतात राहत असलेल्या चार घरांसाठी एक लाखाची दोन इंच पाईप लाईन टाकून, तर निंभोरी तांडा येथे १५ व्या वित्त आयोगातून साडेचार लाख रुपये खर्च करून शोष खड्डे करण्याची योजना राबविली आहे. मात्र साडेचार लाख रुपये खर्च करुन निंभोरी तांडा येथे केवळ अर्धा फुट खोलीचे १० खड्डे करुन साडेचार लाख रुपये लाटल्याने निंभोरी बुद्रुक ग्रामपंचायतीत साडेसहा लाख रुपये अनाठायी खर्च करून जनतेच्या पैशांची लुट केल्याने सदर प्रकरणाची चौकशी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी दिवटे यांनी दिनांक २६ मे रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

निंभोरी बुद्रुक ग्राम पंचायतीत १५ वित्त आयोगातून शासनाच्या नियम गावांतर्गत पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती करण्याचा नियम धाब्यावर बसवून केवळ चार घरांसाठी दोन इंच पाईप लाईन टाकून एक लाख रुपयांचा चुराडा केला आहे. निंभोरी तांडा येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निघीतून साडे चार लाखांचे केवळ एक फुटांचे दहा खड्डे गेले ते खड्डे खोदण्यासाठी केवळ ५० हजार रुपये ही लागले नाहीत. याशिवाय तांडा वस्तीत एक लाखाच्या गटारीचे कॉंक्रेटीकरण केले यात जुन्याच गटारीवर अर्धा इंच कॉंक्रेट टाकून एक लाख रुपये वाटले यामुळे मिनाक्षी दिवटे यांनी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या कडे २६ मे पासून तक्रारी अर्ज दाखल केला असतांना अद्याप चौकशी करण्यात आली नाही. यामुळे संबधीत ग्रामसेवक व सरपंचास गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पाठीसी घालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

त्यांच्यावर आरोप त्यांचेकडेच चौकशी

निंभोरी बुद्रुक येथील ग्रामपंयतीत १५ व्या वित्त आयोगातून १ लाखांची पाईप लाईन व साडेचार लाखांचे शोषखड्डे ही योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाचोरा यांचेमार्फत राबविण्यात आली. यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे उपअभियंता व शाखा अभियंता यांनी झालेल्या कामाची पाहणी मोजमाप न करता साडेपाच लाख रुपयांचे बिले काढून दिली आहेत. भ्रष्टाचाराच्या चौकशी बाबत विचारणा केली असता संबंधीत विस्तार अधिकारी राजकुमार धस यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी व शाखा अभियंता यांचेकडे प्रकरण चौकशीला पाठविले असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले. म्हणजेच ज्यांनी काम करताच पैसे काढून दिले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता ते स्वतः चीच चौकशी कशी व कोणत्या पद्धतीने करणार, गटविकास अधिकाऱ्यांच्या या चौकशी आदेशाचे तालुक्यातून अतीशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content