यावल शहरासह तालुक्यात हिवताप सर्वेक्षण व जनजागृती

 

 

यावल  : प्रतिनिधी  । शहरात व तालुक्यात विशेष हिवताप मोहीमे अंतर्गत सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.

 

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे  व जिल्हा  हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, यावल व रावेर तालुक्याचे हिवताप  पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात विशेष हिवताप मोहीम राबवून  जनजागृती करण्यात  येत आहे.

 

मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. यात डॉ. हेमंत ब-हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी.बारेला, व हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी आज यावल येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात डॉ. हेमंत ब-हाटे यांची भेट घेऊन आगामी काळात हिवताप, डेंगी ताप, चिकुनगुनिया, व हत्तीरोग या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव  वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना, घ्यावयाची काळजी व कार्यवाहीबाबत चर्चा केली. कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाबरोबर जनतेचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या आजारांवर आपण नियंत्रण मिळू शकत नाही. असेही त्या म्हणाल्या.

यावल शहरातील बोरावल गेट, तडवी कॉलनी व महाजन गल्ली या भागात जाऊन पाण्याचे कंटेनर, डास उत्पत्ती स्थाने, याची  पाहणी केली. संशयित डेंगू रुग्णांची भेट देऊन त्यांच्या तब्येतीबद्दल चर्चा केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून हिवताप, डेंगी ताप, व चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळावा, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील व घराबाहेरील टाकी आठवड्यातून एक वेळेस पूर्णपणे रिकामी व घासून-पुसून  स्वच्छ करून पुन्हा भरून झाकून ठेवावी, इमारतीच्या गच्चीवर व परिसरात टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी अशा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. गावालगतच्या नाल्या मधील पाण्यात गप्पी मासे सोडावे इ. बाबत जनजागृती केली. यावेळी आरोग्य सहाय्यक आर. आर. ठाकूर, आरोग्य सेवक संजय अहिरराव, संदीप पाटील, मकरंद निकुंभ, व्‍यंकटी जबडे आदी उपस्थित होते.

यावर शहरातील बोरावल गेट, बाबूजी पुरा, शिवाजीनगर, तडवी कॉलनी, महाजन वाडा, इस्लामपुरा भुसावळ रोड या भागात कंटेनर सर्वेक्षण करून एडिटिंग केले. रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. याकामी कोविड केअर सेंटर साठी   नियुक्त आरोग्य सेविका व प्रा. आ. केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व पर्यवेक्षक आदी काम करीत आहेत.

 

Protected Content