यावल येथे मृत झालेल्या भाजी विक्रेत्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

यावल प्रतिनिधी । शहरातील तिरूपती नगरातील रहिवासी असणार्‍या व आज पहाटे उपचार सुरू असतांना मृत झालेल्या भाजी विक्रेत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येणार असून हा भाग सील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल शहरात कालच कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यातच तिरूपती नगर परिसरातील एका ४५ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना सदृश्य व्याधीने मृत्यू झाला आहे. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दरम्यान, आरोग्य यंत्रणांनी दिनांक १८ मे रोजीच संबंधीत व्यक्तीचा स्वॅब नमूना घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. या व्यक्तीचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून यात तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, आज पहाटे मृत झालेला भाजी विक्रेता हा कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर येताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. तहसीलदार, पोलीस निरिक्षक व तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांची याबाबत बैठक सुरू झाली असून लवकरच तिरूपती नगराचा परिसर सील करण्यात येणार आहे. तसेच संबंधीत मयताचे कुटुंबिय आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content