यावल, प्रतिनिधी । राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य, ज्वारी, मका खरेदी करण्यात यावे सुचना केल्या आहेत. ही खरेदी ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शासन निर्णयातील, सुचनेनुसार एफएक्यु दर्जाचे भरडधान्य (ज्वारी, मका) खरेदी संस्थामार्फत करण्यात येणार आहे. त्याचा खरेदी कालावधी ३० जूनपर्यंत राहणार आहे. ही खरेदी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येईल. त्याकरीता तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सह संस्थेची उपाभिकर्ता संस्था म्हणुन निवड झालेली आहे. नोंदणी करण्याकरीता शेतकरी बांधवांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समीती कार्यालय यावल येथे जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन कोरपावली येथील सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे. दरम्यान, भरडधान्य केंद्र मिळवण्याकरीता कृषी उत्पन्न बाजार समीती यावलचे सभापती तुषार (मुन्ना) पाटील व सर्व संचालक मंडळाने जिल्ह्याचे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ना.पाटील यांनी तात्काळ मदत केल्याने हे शक्य झाले असे यावेळी ते म्हणाले. ही खरेदी ७/१२ नोंदीनुसार पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता व आद्रता विचारात घेऊनच मका व ज्वारीची खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल स्वच्छ व कोरडा करुनच विक्री केद्रावर आणावयाचा आहे. शासन निर्णयानुसार भरडधान्य खरेदी करतांना ज्वारी (संक्ररीत) आधारभूत किंमत २५५० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी (मालदांडी) २५७० रुपये प्रतिक्विंटल, मका १७६० रुपये प्रतिक्विंटल हेच दर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. त्यासाठी यावल तालुक्यात १८ मे पासुन पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) ज्वारी मका नोंदणी व खरेदीस सुरवात होत आहे, तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार सांडुसिंग पाटील व कोरपावली वि. का. सो.चे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.