यावल तालुक्यात गावठी दारूची खुलेआम विक्री ; राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांसमोर आव्हान

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यात वाळु माफीया, भुखंड माफीयानंतर आता गावठी दारू माफीयाचे प्रस्थ वाढत असून त्यांची खुलेआम सार्वजनिक ठिकाणी दारूची विक्री  करण्यापर्यंत मजल गेली असून राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. 

या संदर्थातील वृत्त असे की, मागील काही दिवसांपासुन यावल तालुक्यातील सांगवी, कोरपावली, सावखेडा सिम, डोंगर कठोरा, अंजाळे, किनगाव, साकळी, न्हावी, आमोदे, पाडळसा, सातोद, भालोद, हिंगोणा, डांभुर्णी, नायगाव, भालशिव या गावांसह यावल शहरातील व परिसरातील काही हॉटेलस तसेच गोळीबार वस्ती, भिल्लवाडा, बोरावल गेट परिसर त्याचप्रमाणे शहरातील काही पानटपऱ्यांवर खुलेआम गावठी व देशी दारू विक्री करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  अशा प्रकारे मिळणाऱ्या दारूमुळे मोठया प्रमाणावर अल्पवयीन मुले, शाळकरी विद्यार्थी, मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणारे सर्वच या दारू व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन त्यांचे कुटुंब उद्धवस्त होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दरम्यान या सर्व प्रकाराबद्दल सर्व प्रशासकीय यंत्रणेला कल्पना असतांना ही प्रशासनाचा या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा कशासाठी आहे असे प्रश्न देखील सर्व सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. तालुक्यात अशा प्रकारे दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही हाच सर्वात मोठा प्रश्न नागरीकांना पडत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावतर गावठी दारू उत्पादनाची केन्द्र बनली असुन भालोद, अंजाळे परिसरात दारू तयार करण्याचे मोठे केन्द्र बनले असल्याचे बोलले जात आहे. 

Protected Content