रिक्षात बसून चौघांनी लांबविली वयोवृध्दाच्या पिशवीतील रोकड 

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेन्शनचे २५ हजार रूपये बँकेतून काढून घरी परतणाऱ्या वयोवृध्दाच्या पिशवीतून २५ हजार रूपयांची रोकड रिक्षाचालकासह इतर तीन जणांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘तुळशीराम गोंडू पाटील (वय-७५) रा. सावखेडा सीम ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून पेन्शनधारक आहेत. सोमवारी ४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते बसने यावल येथे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आले होते. दुपारी एसबीआय बँकेतून त्यांनी २५ हजार रूपये रोख खात्यातून काढले व कापडीपिशवीत ठेवले. बसस्थानकाकडे पायी जात असतांना एक अनोळखी रिक्षा चालक त्यांच्याजवळ आला व “मी सावखेडा येथे जात आहे. तुम्हाला यायचे आहे का ?” असे विचारले. ‘हो’ म्हणत ते रिक्षाच्या मागच्या सिटवर बसले. त्यावेळी त्यांच्या बाजूला अज्ञात दोन जण अगोदरच बसलेले होते. पुढे अजून एकजण रिक्षा चालकाच्या बाजूला बसला. पुढे जावून सावखेडा रोडवरील कृषि अधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ जावून रिक्षा थांबविली.

रिक्षा चालक म्हणाला की, “मी तेलाची कॅन घ्यायला विसरलो.” म्हणून तुळशीराम पाटील यांना खाली उतरवून पुन्हा रिक्षा घेवून चौघेजण यावलच्या दिशेने निघून गेले. दरम्यान त्यांच्या पिशवीतील २५ हजाराची रोकड आढळून आली नाही. रिक्षातील चौघांनी संगनमताने पिशवीतील २५ हजार रूपये चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.” त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Protected Content