यावल, प्रतिनिधी | येथील जिल्हा आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत राबवण्यात येत असलेल्या लघु उपसा जलसिंचन योजनेत सन २००४ ते २००९ या काळात तत्कालीन चार प्रकल्प अधिका-यांसह जळगाव येथील दोन संस्थांच्या अध्यक्षांविरूध्द येथील पोलीस ठाण्यात २० लाख ४२ हजार रुपये अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एका प्रकल्प अधिका-याविरूध्द पाच लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण सुमारे ४५ लाख ६४ हजाराचा अपहार केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबातच्या कागदपत्रांचा पोलीस अभ्यास करीत आहेत.
येथील प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांसाठी असलेल्या लघु उपसा जलसींचन योजनेत सन २००६ ते २००९ या दरम्यान तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस.टी. भालेकर, एन.एम. निकुंभे, जी.एन. वळवी, टी.बी. पाडवी, यांनी जळगाव येथील अध्यक्ष, सेक्रेटरी अन्नदाता कृषी संशोधन संस्था जळगाव व व्हिलेज कम्युनल्स सोसायटी यांचेबरोबर संगनमत करून २० लाख ४२ हजार रुपयाचा अपहार केला असल्याची फिर्याद प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. अरूण धनवडे, हे.कॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.
अपहारीत गुन्हयाची सर्व कागदपत्रे नासीक येथील आयुक्त कार्यालयाकडे असून ती पोलीस बंदोबस्तात आहेत. अपहारीत रक्कमा व योजनेचा पोलीस कागदपत्रांची पाहणी करून अभ्यास करीत आहेत. ज्या योजनेचा अपहाराचा आणि रकमेचा ठपका ठेवलेला आहे त्यात किती जन सहभाग आहेत तसेच रकमेचा अपहार आहे किंवा अनियमीतता आहे या संदर्भातही पोलीस चाचपणी करीत असल्याचे तपासाधिकारी यांनी सांगीतले.
दुस-या गुन्हात सन २००४ ते २००९ दरम्यान तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस.टी. भालेराव यांनी पाच लाख २१ हजार ९९१ रुपयाचे पिव्हीसी पाईप आदिवासी शेतक-यांना न वाटता परस्पर विल्हेवाट लावली असल्याच्या फिर्यादीवरून भालेराव यांचेविरूध्द दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या कार्यालयात झालेल्या दुस-या एका गुन्हयात पाच लाख २१ हजार ९९१ रुपये असा एकूण ४५ लाख ६४ हजाराचा अपहार करण्यात आला आहे.