यावल आगाराच्या बसवर दगड फेक : सेवा पुन्हा ठप्प (व्हिडिओ)

यावल, अय्युब पटेल | परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. यानुसार आज यावल आगारातील १०-१२ कर्मचारी पुन्हा कामावर येत बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र, या बसवर दगड फेक झाल्याने बस सेवा पुन्हा ठप्प झाली. तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस सेवा सुरु करण्यास आडकाठी केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवार हा यावलचा आठवडे बाजार दिवस आहे. याचे औचित्य साधून व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील १०-१२ कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होवून बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आगारातील बारा कामगारांनी आगार प्रमुख शांताराम भालेराव यांना, विभाग नियंत्रक यांच्या नोटिशीचा संदर्भ देत रुजू होण्याबाबत चे पत्र दिले. सायंकाळी चार वाजेपासून येथील आगारातून पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने जळगाव साठी तीन बसेस सोडण्यात आल्या. यातील यावल-इदगाव-जळगाव बस(एमएच २० बीएल ३४७१) यावलपासून चार किलोमीटर लांब वाढोरे या गावी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोहचली असता काही अज्ञातांनी मोटर सायकलवर येऊन बसवर दगड फेक करत काचा फोडल्या. याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, यावल आगारप्रमुख व्ही.एस.भालेराव यांनी तात्काळ सदरची माहीती पोलीसांना कळविली. यानंतर यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यात रावेरची पोलीस निरीक्षक तथा यावल प्रभारी कैलास नागरे व यावलचे पोलीस उप निरीक्षक जितेंद्र खैरनार,  विनोद खांडबहाले व पथकाचा समावेश आहे. त्यांनी पंचनामा करून गाडी यावल बस स्थानकात रवाना केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे चेतन अढळकर व कमलाकर घारू,सुमित युवराज घारु, जुगल श्रीनिवास पाटील, आकाश सतीष चोपडे यांनी बस स्थानकावर येवून जो पर्यंत एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलणीकरणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बस सेवा सुरु करू नये असा पवित्रा घेत एसटी बसेस अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/268652215311321

Protected Content