यावल, प्रतिनिधी। दिड महिन्यांपासून लॉक डाऊनमुळे नाशिक येथे अडकलेले मध्य प्रदेश येथील १६ कुटुंबीय आपल्या चिमुकल्यांसह आपल्या राज्यात परत जात असल्याचे यावल येथे काँग्रेसचे कार्यकर्ते यांना व काही राजकीय कार्यकत्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी प्रशासनाशी संपर्क केल्यांनतर येथील यावल एस. टी. आगाराच्या दोन बसेसव्दारे त्या कुटूंबियंना दोन्ही राज्याच्या सीमेवरील चोरवड टोल नाक्यापर्यंत सोडण्यात आले.
नाशिक येथे द्राक्ष मळ्यात काम करण्यास गेलेल्या मध्य प्रदेशातील १६ कुटूंबे गेल्या दिड महीन्यापासून नाशिक येथे लॉक डाऊन मुळे अडकले होते. त्यांना आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी काहीही व्यवस्था नसल्याने द्राक्ष मळे मालकांनी प्रत्येक कुटूंबियास दिलेले दिड हजार रुपयात त्यांनी सायकली विकत घेवून त्या सायकलीवर आपल्या संसाराचे सर्व सामान बांधुन गेल्या पाच दिवसापासून चिमुकल्यांसह मध्य प्रदेशाकडे जाण्यास निघाले होते. ते यावल येथ आले असतांना येथील काँग्रेसचे शहर अध्यक्ष कदिरखान, अनिल जंजाळे , काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे रहेमान खाटीक आदी कार्यकर्त्यांनी तत्काळ येथील तहसीलदार तथा ईन्सिडेंट कमांडर जितेंद्र कुंवर यांचेशी संपर्क साधला. तहसीलदार कुंवर यांनी यावल आगार प्रमुख शांताराम भालेराव , जे. पी. जंजाळ, संदीप अडकमोल, वाहतुक नियंत्रक विकास करांडे यांनी अखेर पारिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन त्या परप्रांतीय कामगारांना मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवरील चोरवड नाक्यापर्यंत आगाराच्या बसेसव्दारे सोडण्याचे मान्य केले. यावेळी आगारातुन काढण्यात आलेल्या दोन बसेसचे र्निजनतुकीकरण करण्यात येवुन नंतर प्रवास करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची सर्व कुटूंबियांची डॉ. राहुल गजरे यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यांनंतर एका आसनावर एक अशी ४४ प्रवासी याप्रमाणे दोन बसेस सोडण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, पं. स. चे नोडल अधिकारी डी. पी. कोते, एन. पाटील, यांनी परप्रांतीय मजुरांची नोंदणी केली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच केलेल्या घोषणेची मुळगावी जाण्यासाठी बसेसव्दारे मोफत प्रवास करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पण आज झालेल्या या परप्रांतीय कामगारांना सोडण्यासाठी विशेष दोन बसेस सोडण्यात आल्यात. दरम्यान, गेल्या पाच दिवसापासून नाशिक येथून चालत आलेल्या कुटूंबीयांनी सुरवातीस प्रशासन क्वारंटाईन करेल या भितीतून पायी जाणार असल्याचेच सांगून एस. टी. चा प्रवास नाकारला होता.