यशप्राप्तीसाठी एकाग्रता व मेहनत आवश्यक : मयुरी झांबरे

जळगाव तुषार वाघुळदे । “जीवनात मेहनत, जिद्द व चिकाटीशिवाय कुठल्याच क्षेत्रात यश प्राप्त होत नाही, मी कुठलेच क्लासेस लावले नव्हते, ध्येय जर नजरेसमोर ठेवले आणि फक्त अभ्यास हा एकाग्रतेने केला तर अगदी सहजगत्या यशोशिखर गाठता येते “हे बोल आहेत मयुरी मधुकर झांबरे हिचे !!

जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागे असलेल्या जुने भगवाननगर येथे मधुकर लिलाधर झांबरे हे वास्तव्यास आहेत. त्यांची सुकन्या मयुरी झांबरे हिने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. मेकॅनिकल, त्यानंतर एम.बी.ए.प्रयन्तचे शिक्षण घेतले. नुकतीच ती आरटीओ परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली आहे. ती आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून लवकरच सेवेत येईल. मयुरी झांबरे आनंद व्यक्त करीत बोलताना म्हणाली ‘शिक्षण घेत असतानाच एमपीएससी (स्पर्धा परीक्षा)चा अभ्यास करीत होती, कुठल्याच प्रकारचे कोचिंग लावले नाही. रोज दोन ते तीन तास या अभ्यासासाठी मी स्वतंत्रपणे राखून ठेवत असे. यासाठी अर्थात आई-वडिलांचे आधीपासूनच खूप प्रोत्साहन मिळत होते. माझे माध्यमिक शिक्षण ए. टी. झांबरे विद्यालयात झाले. तिथे फेगडे सर, प्रणिता झोपे, नारखेडे आदींचे प्रोत्साहन लाभले.

आपण स्वतः सीईओ असतो आणि आपले मन हे मॅनेजर आहे; नजरेसमोर थोर व्यक्ती व आदर्श समोर ठेवले आणि जीवनातले पक्के ध्येय असले की, आपण यशाचे शिखर गाठू शकतो. अभ्यासाचा कधी मी बाऊ केला नाही. दररोज सकाळी थोडा वॉक, नंतर मनन, चिंतन करणे तसेच विरंगुळा म्हणून जुने-नवे गाणी ऐकली की मन प्रसन्न होत असते. ठरवलेला अभ्यास मी नियमितपणे करत असे. ज्यावेळी मन ध्येयाने प्रेरित होते, तेव्हा एकाग्रता वाढीस लागते व यश मिळते. मेहनतीशिवाय जीवनात आपण काहीच मिळवू शकत नाही असेही मयुरी झांबरे हिने सांगितले.

लवकरच नाशिक येथे प्रशिक्षण सुरू होईल आणि मग पोस्टिंग होईल असेही तिने सांगितले. झांबरे यांना दोन मुले असून मोठा निखिल हा युपीएससी ( स्पर्धा परीक्षेचा) अभ्यास करीत असून लहान मुलगा मिलिंद हा बी.ई.चे शिक्षण घेत आहे. झांबरे हे मूळचे यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आहेत .अनेक वर्षांपासून जळगावी स्थायिक असून मुलांना उच्च शिक्षण मिळावे, चांगले संस्कार बिंबवले जावे आणि त्यांनी जिल्ह्याचे , समाजाचे नाव उंचावर न्यावे त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असून जीवनात अनेक संघर्षाचा सामनाही केला ,मात्र त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन मात करत गेलो अशी आनंददायी भावना मयुरी हिचे वडील आणि जळगांव महापालिकेत कार्यरत असणारे मधुकर लिलाधर झांबरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

Protected Content