जळगाव,प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीच्या माध्यमातून दरवर्षी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण खान्देशात या महोत्सवला लोकमान्यता मिळाली आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने यावर्षीचा भुलाबाई महोत्सव ऑनलाईन होत असल्याने यंदा प्रवेशिका पाठवण्याची मुदत २५ ऑक्टोबर होती ती २९ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
यंदा या महोत्सवाचे १८ वे वर्ष साजरे होत आहे. खानदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे सादर करत घरोघरी हिंडायच्या या माध्यमातून एकमेकींचे नाते आणि एकोपा टिकण्यास मदत होत असे. परंतु काळाच्या ओघात या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे हे निश्चित. अशा या उत्सवाचे महत्व जाणून केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी च्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन केले जाते.
खान्देशात साजरा होणारा भुलाबाई महोत्सव हा अशा स्वरूपात महराष्ट्रात कुठेही साजरा होत नाही. या निमित्ताने शाळा, महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्याची स्पर्धा होते. दरवर्षी महिला व मुली भुलाबाईच्या पारंपारिक लोकगीतामध्ये काही सामाजिक संदेशाची पेरणी करतांना दिसतात. मुली व महिला या उत्सवात हिरहिरीने सहभाग नोंदवून मनोसोक्त आनंद साजरा करतात. यावर्षीचा भुलाबाई महोत्सव कोरोना संकट परिस्थितीमुळे ऑनलाईन होणार २ गटात होणार आहे. या मध्ये ५ ते १५ वयोगटाचा एक गट व १५ वर्षे पुढील खुला गट असे नियोजन करण्यात आले आहे. . या स्पर्धेत प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणर आहे.
यंदा भुलाबाई महोत्सव ऑनलाईन असल्याने राज्यस्तरीय होणार आहे. यात जळगाव शहराबाहेरील संघांना प्रवेश मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी भुलाबाई महोत्सवात सहभागी व्हावे असे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले असून अधिक माहितीसाठी महोत्सव प्रमुख वैशाली पाटील ९४०३२५२७६७, पियुष रावळ ९४२३१८७१६६ , हेमंत भिडे ८४११८९६२९३, सागर येवले ९००४१८४३३३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.