कुसुंबा येथील तरूणावर चॉपर हल्ला; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । देवी पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला झाला. जखमीवस्थेत मित्रासह उपचारासाठी जात असतांना पुन्हा पाच ते सहा जणांनी चॉपर हल्ला करत दोघांना जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संतोष सुभाष कोळी (वय-२१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावात देवीच्या दर्शनासाठी जात असतांना एका मंडळाजवळ आले. दुचाकी पार्किंग करत असतांना गोलू चौधरी (रा. तुकाराम वाडी, जळगाव) हा जवळ येवून काहीही कारण नसतांना संतोष कोळी यांच्यावर चाकूने वार केले. यात छातीवर आणि कमरेला वार लागल्याने गंभीर जखमी झाले. झालेल्या झटापटीत आपला स्वत:चा जीव वाचवत संतोष कोळी हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मित्र पंकज गणपत योकुळे यांच्यासोबत उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असता उड्डाणपुलाजवळ कुणाल पाटील, राहुल बिऱ्हाडे, गोलू चौधरी, मयुर चौधरी, करण शिंदे, सागर अवतारे (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी रस्ता अडविला. यावेळी पंकज योकुळे आणि संतोष कोळी या दोघांना पुन्हा बेदम मारहाण केली. संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content