नवी दिल्ली : वृत्तसंस्था । म्यानमारमधील सत्ता सैन्याने 1 फेब्रुवारीला ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांची दिवसाढवळ्या रस्त्यात हत्या केली जातेय. जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु आहेत. जनता आणि सैन्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत 300 पेक्षा अधिक आंदोलकांचा बळी गेला आहे.
असिस्टंट असोसिएशन फॉल पॉलिटिकल प्रिजनर्सने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 320 आंदोलकांची सैन्याने हत्या केली 2 हजार 981 आंदोलकांना अटक केली आहे. आंदोलकांना जबरदस्तीने अटक व खटले दाखल केले जात आहेत.
यंगूनच्या थिंगांग्युन टाऊनशिप, सागांर परिसरातील खिन-यू टाऊन, काचिन राज्यायातील मोहिनी टाऊन आणि शान राज्यातील ताऊंग्गी शहरात काल 9 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या आदल्या दिवशी 23 आंदोलकांचा बळी घेण्यात आला होता. आतापर्यंत सैन्याने जेवढ्या लोकांना अटक केली आहे, त्यातील 24 जणांविरोधात आरोप सिद्ध झाले आहेत. 109 लोकांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 2 हजार 418 लोक ताब्यात आहेत किंवा त्यांच्यावर अभियोगाचा खटला भरण्यात आला आहे.
म्यानमारमध्ये लष्करशाहीकडून सुरु असलेल्या हिंसक कारवाईचे पडसाद आता जगभरात उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेसह अन्य देशांनी म्यानमारमधील लष्कराने सुरु केलेल्या अन्यायावर नाराजी व्यक्त केली आहे.
म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसीला अभूतपूर्व यश मिळालं. सू ची यांच्या पक्षाला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. मात्र, कुठलेही पुरावे नसल्याचं सांगत म्यानमारच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला होता. आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचं संसदीय सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होतं. लष्कराने पुन्हा एकदा उठाव करुन संसदीय सत्र सुरु होण्यापूर्वीच देशाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.