निर्भया सामुहिक बलात्कारातील चारही नराधमांना 22 जानेवारी रोजी फाशी

nirbhaya case

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आठ वर्षांपुर्वी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना दोषी ठरवत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता चारही नराधमांना फाशी देण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. या चौघेही तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीवेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या वकिलांनी केला. तर आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करायची आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. माझ्या अशिलांना मी भेटू शकलो नाही. त्यांचा तुरुंगात मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप करत दोषिंच्या वकिलांनी कोर्टात नवीन याचिका दाखल केली. तर निर्भयाच्या कुटुंबीयांनी चारही दोषींच्या विरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली. डेथ वॉरंट जारी केल्यानंतरही दोषींना त्यांचं म्हणणं मांडता येणार आहे. दोषींची एकही याचिका पेंडिग राहिलेली नाही. त्यामुळे कोर्ट या आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी करू शकतं, असं निर्भयाच्या आईने कोर्टाला सांगितलं. सरकारी वकिलांनीही आरोपींच्यावतीने सादर करण्यात आलेल्या याचिकेला विरोध केला आणि ही याचिका केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ही सुनावणी सुरू असताना निर्भयाची आणि आरोपी मुकेशची आई कोर्टात रडल्या.

आठ वर्षांपूर्वी, १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत निर्भया नामक तरुणीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या अत्याचारामुळं गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Protected Content