मोर्चा काढून दिली संपाची नोटीस

जळगाव प्रतिनिधी । अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला असून याची नोटीस मोर्चा काढून जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आली.

शिवतीर्थ मैदानावरून हा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला. यानंतर जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर.तडवी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात एक हजारावर अंगणवाडी सेविका, कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. पुढील दोन दिवसीय संपात सहभागी होऊन कामकाज बंद ठेवण्याचे निवेदन या वेळी देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, मीनाक्षी चौधरी, सविता वाघ, ज्योती पाटील, सुलोचना पाटील, मीना गढरी यांच्यासह हजारावर अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गट प्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या.

मोर्चेकर्‍यांनी अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अर्थसंकल्पीय निधीत वाढ करावी. अंगणवाडी कर्मचार्‍यांना पूर्ण वेळ काम देऊन शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन द्यावे. , गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा. रिक्त झालेल्या जागांवर अनुकंपा तत्वाववर वारसांना थेट सामावून घ्यावे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करावे. नागरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे सुधारित भाडे विनाविलंब लागू करावे आदी मागण्या केल्या आहेत.

Add Comment

Protected Content