मोदी सरकारला दणका देणारे १३ शेतकरी नेते

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकरी संघटनांनीच शेतकऱ्यांचा मवाळ पण कणखर आवाज ऐकण्यास सरकारला भाग पाडलंय. शेतकऱ्यांच्या या आंदोलनातल्या १३ शेतकरी नेत्यांविषयी माहिती अशी आहे ..

गेल्या १५ दिवसांपासून केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारनं तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिल्यानं बुधवारी शेतकरी संघटनांनी सरकारनं दिलेला तडजोडीचा प्रस्ताव एकमुखाने फेटाळून लावला. मात्र, मोदी सरकारनं नव्यानं प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्याची शेतकऱ्यांच्या नेत्यांनी तयारी दर्शविली आहे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करताना, शेतकऱ्यांच्या संघटनांनी १४ डिसेंबर रोजी देशभर धरणं आंदोलन, भाजप मुख्यालयांना तसेच मंत्र्यांना घेराव करण्याच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यानं हे आंदोलन आणखी चिघळण्याची आणि लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनात मुख्यत: पंजाबच्या काही शेतकरी संघटनांचा पुढाकार आहे.

भारतीय किसान युनियन एकता उग्राहन सदस्यांच्या संख्येच्या दृष्टीने पंजाबची ही सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे. १२ जिल्ह्यांमध्ये या संघटनेच्या शाखा आहेत. मालवा भाग हा या संघटनेचा गड मानला जातो. जोगिंदर सिंह उग्राहन हे या संघटेचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेसाठी कॉल करून बोलावलेल्या नेत्यांपैंकी एक जोगिंदर सिंह आहेत.

बीकेयू एकता डकोंडा ही संघटनादेखील दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातील एक महत्त्वाची संघटना आहे. पंजाबच्या मालवा भागातील बरनाला, बठिंडा आणि मंसा जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. बूटा सिंह बुर्जगिल या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत.

बीकेयू लाखोवाल ही पंजाबमधील सर्वात जुनी संघटना आहे. मालवा क्षेत्राच्या बाहेरही या संस्थेचा जम आहे. परंतु, ही संघटना लुधियानात अत्यंत प्रभावशाली आहे. या संघटनेचे अध्यक्ष अजमेर सिंह लाखोवाल आहेत. लाखोवाल हे अकाली दल – भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंजाब अ‍ॅग्री पणन मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांचा मुलगा हरिंदरसिंग लखोवाल सध्या या आंदोलनात खूप सक्रिय आहे.

एकेकाळी पंजाबमध्ये बीकेयू राजेवाल ही अत्यंत लोकप्रिय शेतकरी संघटना होती. परंतु अनेक नवीन संघटना उदयास आल्यानंतर या संघटनेचा पंजाबमधला प्रभाव कमी झाला. या संघटनेचे अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांचा शेतकरी वर्गात मोठा जम आहे.

बीकेयू सिधुपुर ही बठिंडा, मुक्तसर आणि मंसा यांसारख्या सूत पट्ट्यांमध्ये जोरदार पकड असलेली ही आणखी एक शेतकरी संघटना. मालवा भागात या संघटनेचा प्रभावही उल्लेखनीय आहे. या संघटनेचे अध्यक्ष जगजितसिंह डालेवाल आहेत.

क्रांतिकारक शेतकरी संघटना ही शेतकरी आंदोलनात सहभागी असलेली आणखी एक सक्रिय संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष आहेत दर्शन पाल… शेतकरी संघटनांच्या वतीने केंद्रासमोर आपलं म्हणणं ठामपणे मांडणाऱ्या नेत्यांपैंकी हे एक नेते आहेत.

क्रांतिकारी किसान यूनियन (सुरजितसिंग फूल) बठिंडाच्या रामपुरा फूल परिसरातील ही एक शेतकरी संघटना आहे. मालवापर्यंत या संघटनेनं आपला विस्तार केलाय. या संघटनेचं नेतृत्व सुरजीत सिंह फूल यांच्याकडे आहे.

कीर्ति किसान यूनियन ही संघटना छोटे भूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेचे अध्यक्ष नीरभाई सिंग आहेत. फरीदकोट तसंच मालवा भागातील इतर जिल्ह्यांमध्ये या संस्थेची मजबूत पकड आहे.

किसान मजदूर संघर्ष समिती ही संघटना प्रामुख्याने माझा (माढा) प्रदेशात सक्रिय आहे. अमृतसर आणि तरण तारण जिल्ह्यातही या संघटनेचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. सतनामसिंग पन्नू यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनेचं प्रदेशात कार्य सुरू आहे.

किसान संघर्ष कमिटी पंजाब २००० मध्ये स्थापन झालेल्या या समितीने भूसंपादनाच्या चळवळीत भाग घेतला आहे. कंवलप्रीतसिंग पन्नू यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करतेय.

पंजाब शेतकरी संघटना ही संघटना केवळ मंसा भागापुरती मर्यादित आहे परंतु कृषी चळवळीच्या निमित्तानं या संघटनेला आपला विस्तार करण्यास वाव मिळालाय. या संघटनेचे अध्यक्ष रुल्दू सिंग मंसा हे चार दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. या संघटनेचा सीपीआय (एमएल) लिबरेशनशी अगदी जवळचा संबंध असल्याचं सांगितलं जातं. या संघटनेनं सुरुवातीला अमित शहा यांना भेटण्यास नकार दिला होता.

​ बीकेयू कादियां — हरमीत सिंग कादियान हे या संघटनेचे प्रमुख आहेत. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या कृषी आंदोलनातील हरमीत सिंग कादियान हे एक तरुण चेहरा बनलेत. ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून मालवा प्रदेशात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.


बीकेयू मंसा ही शेतकरी चळवळीशी संबंधित एक नवीन परंतु प्रभावी संस्था आहे. या संघटनेत प्रामुख्याने अशा सदस्यांचा समावेश आहे जे यापूर्वी इतर संस्थेचं एक भाग होते. बोगसिंग मानसा या संघटनेचे प्रमुख आहेत.

Protected Content