सातारा : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या भेटीवर खासदार उदयनराजे यांनी राजकीय तडजोडीचा संशय व्यक्त केला आहे . अत्यंत जहाल व संतप्त भाषेत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतल्याचेही समोर आले आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला आहे.
उदयनराजे म्हणाले, “ पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण असं असं.. आपण एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असंच होणार असं मला वाटतंय, हो की नाही?”
“ आता एवढं सगळं चाललंय प्रकरण संपूर्ण राज्यात कोणतरी कोणत्यातरी मजल्यावरून पडतं, कोणाच्या गाडीत काय सापडत आहे, कुठेतरी काहीतरी होतय म्हणजे कुठंतरी काहीतरी घडतंय हे सगळं सर्वांना माहिती आहे ना… मग त्यामध्ये भेटून काय होणार असतं, तर काय होणार तुम्ही आम्ही एकत्र येऊया आपलं लग्न परत लावूया आणि समाजाला शांत करूया. म्हणजे काय एकतर मुस्लिमांना पुरा आणि हिंदूंना जाळा एवढंच आता बाकी राहिलं आहे. एवढी आग या आरक्षणामुळे लोकांच्या मनात पेटलेली आहे. काय बोलणार?” असं उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखवलं.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर उदयनराजे भोसले यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.