मोदीनी लक्षात घ्यावं लढाई कोरोना विरोधात आहे, काँग्रेस किंवा राजकीय विरोधकांविरुद्ध नाही — राहुल गांधी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “मोदी सरकारने हे लक्षात घेणं आवश्यक आहे  की लढाई कोरोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय विरोधकांविरुद्ध नाही.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. ट्विटसोबत त्यांनी सोनिया गांधी यांच्या  विधानाची बातमीदेखील शेअर केली आहे.

 

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज लाखांच्या संख्येत बाधित वाढत आहेत. रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. या महामारीच्या संकटात भारताच्या मदतीसाठी जगभरातून अनेक देशांनी हात पुढे केला आहे. मात्र अद्यापही देशातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे.

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोविडविरोधातील लढाई ही ‘आम्ही विरुद्ध तुम्ही’ अशी नाही, तर ती आपण विरुद्ध कोरोना अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढायची आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे मत व्यक्त केलं आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

 

या अगोदर राहुल गांधी यांनी “रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकार कोरोनाची खरी आकडेवारी जनतेपर्यंत पोहचू देत नाही. महामारी नाही तर महामारीचं सत्य तर नियंत्रणात केलंच आहे.” अशी देखील केंद्र सरकारवर टीका केलेली आहे.

 

‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असंही राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.

Protected Content