दिसपूर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या सिलचर येथील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
सिलचर येथील गुरचरण कॉलेजात सौरदीप गेल्या एक वर्षापासून कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवत होते. . ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी दिल्लीत २००२ गोध्रा दंगलीच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट सध्या डिलीट करण्यात आली आहे. दरम्यान, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कॉलेजमधील एकूण १० विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत सौरदीप यांनी हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करत जातीय हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, सौरदीप यांनी फेसबुक पोस्ट डिलीट करत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असेही गुरुवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते.