नवी दिल्ली: वृत्तसंस्था । दुसऱ्या सीरो सर्वेक्षण अहवालानुसार अजूनही देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ( आयसीएमआर ) दुसऱ्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षण अहवालानुसार, ऑगस्ट २०२० पर्यंत १० वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक १५ व्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
देशात निर्माण झालेली स्थिती आणि वर्तमान स्थितीची माहिती देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि नीती आयोगाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. देशातील मोठी लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकते अशी शंका सीरो सर्वेक्षण अहवालात उपस्थित करण्यात आल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले. अशात 5T स्ट्रॅटेजीचा (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी) अवलंब करावा लागणार आहे
पुढील महिन्यात देशातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये अनेक सण, उत्सव येत आहेत. हिवाळा देखील सुरू होत आहे. लोक मोठ्या संख्येने एकत्र येण्याची शक्यता आहे. यासाठी देशातील सर्वच राज्य सरकारकांनी नवी नियंत्रणाची रणनीती आखणे क्रमप्राप्त असल्याचे भार्गव म्हणाले. गेल्या २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येहून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.