मोठी बातमी : जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटींच्या निधीला मंजुरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

 

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील लक्षणीय निर्णय म्हणजे जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या नव्याने बनणार्‍या ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

 

केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने जळगाव ते जालना या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. आधी या मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले होते. तर याला आज मोठ्या रकमेच्या निधीची मान्यता मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाचा रस्ता मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

 

असा आहे रेल्वेमार्ग

 

जालना ते जळगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग १७४ किलोमीटर लांबीचा आहे. यात  जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, पहूर आणि जळगाव अशी स्थानके राहणार आहेत. यात याच मार्गावरील अजून काही स्थानकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गामुळे खान्देश आणि मराठवाड्याची वेगवान कनेक्टीव्हिटी होणार आहे.

Protected Content