बी-बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवा !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात बी बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवून कृषी केंद्र चालकांची दुकाने व गोदामांची तपासणी करून कारवाई करून मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन हे तालुका कृषी अधिकारी कु.आरती साळी व तहसीलदार हे जळगाव येथे मिटिंगला असल्याने त्यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आले.

आपला तालुका हा कृषी क्षेत्राचं खूप मोठी बाजारपेठ असून यामध्ये खते विक्री करणारे कृषी केंद्रांची संख्या खूप जास्त आहे बाजारपेठ असल्याकारणाने शेतकऱ्यांचे हित साध्य झालं पाहिजे, अशी अपेक्षा असते. परंतु आपल्या शहरात तालुक्यात शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे. कापूस बॅगांची शासकीय किंमत 853 असून काही विशिष्ट बॅगांची वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करून व कृत्रिम पद्धतीने टंचाई निर्माण करून चढ्या दराने ( म्हणजेच १२०० ते १५०० रुपयांना) कृषी केंद्र चालक विक्री करताना दिसत आहे, तसेच रासायनिक खतांच्या बाबतीत शेतकऱ्याने ज्या खताची मागणी केली. त्या खतासोबत दुसरी म्हणजे दोन बॅगांवरती एक बॅग बळजबरीने दिली जाते. जी शेतकऱ्याला नको असते, परंतु जर शेतकऱ्यांने घेण्यास नकार दिला तर आमच्याकडे कोणतेही खते शिल्लक नसल्याबाबत दुकानदारांकडून सांगितलं जातं. सोबतच खतांची कृत्रिम टंचाई भासविण्यात येत असून कृषी केंद्र संचालकांनी शहरासह तालुक्यातील काही खेड्यात शासनाला माहीत नसलेले गोदाम घेऊन त्यात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवला आहे. याची कल्पना शासनाला आहे का? शासनाला अंधारात ठेवून इतर गोदामांमध्ये खूप मोठा खतांचा साठा शिल्लक असल्याबाबत संघटनेला कळते पण शासनाला का कळत नसावे.? आणि यासंदर्भात कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने खताची लिंकिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचे कटकारस्थान कृषी केंद्र संचालक करताना दिसत आहेत. शेतकरी किंवा महाराष्ट्र शेतकरी संघटना आपल्याकडे तक्रार अर्ज करेल आणि मग आपण चौकशी कराल असे न करता सरसकट सर्व दुकाने त्यांची आपल्याला माहित असलेली गोदाम व माहीत नसलेली गोदामं तपासणी करून तात्काळ कारवाई करावी व आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा संघटनेचा व शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन, प्रशासनच जबाबदार राहील याची विशेष करून नोंद घ्यावी.

आताच बियाणे व खतं खरेदी करण्याची वेळ असून आपण आज पासून पाच दिवसातच कारवाई करावी कारवाई न झाल्यास संघटना अती तिव्र पध्दतीने आंदोलन करेल, याची दखल घ्यावी. निवेदन देण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, महाळपुर शाखाध्यक्ष शांताराम पाटील, बाभळेनाग शाखा प्रमुख मयूर ठाकूर, बाभळेनाग शाखा उपाध्यक्ष सागर माळी,आरोग्य प्रमुख देवेंद्र पाटील,इटवे शाखाध्यक्ष दिनेश शेलकर,दिपक पाटील, अनिल पाटील, मुजाहिद खाटीक यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

Protected Content