मोटारसायकल १० हजारांनी स्वस्त होण्याची आशा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था।  बाइक आणि मोपेडसारख्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने दुचाकीवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवल्यास हे शक्य आहे, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार दुचाकींवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करीत आहे. सीआआयशी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

जीएसटी कौन्सिल दुचाकींवरील करदरांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. वर्षभरापासून वाहन उद्योगाची स्थिती बिकट असून, त्यात आता करोनाची भर पडली आहे. राजीव बजाज यांच्या मते वाहन उद्योग वर्षभर अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळे जीएसटीचे दर कमी करून उद्योगाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यास ग्राहक आणि वाहन उद्योगालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

‘ दुचाकी चैनीच्या वस्तूंत मोडत नाहीत. सध्या दुचाकींवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही गेल्या वर्षी दुचाकी वाहनांच्या विक्रीवरील जीएसटी दरात घट करण्याचे आवाहन केले होते. त्याची सुरुवात १५० सीसी मोटारसायकलवरील जीएसटी १८ टक्के करून होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Protected Content