सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांच्या धोरणावर प्रियांका गांधींची टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा घेण्यामागचं नेमकं कारणच मला कळत नाहीये, असं म्हणत प्रियांका गांधींनी  ट्विटरवरून  परीक्षांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

 

कोरोना  पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचं मोठं संकट बाहेर असताना परीक्षा घ्यायला हव्यात की नाहीत? यावर मोठी चर्चा सुरू   आहे.

 

 

ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की “सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे की या परीक्षा ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतल्या जात आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण धडा का घेत नाही आहोत? बंद जागांमध्ये एकत्र येण्यामुळे कोविडचा प्रसार होतो. दुसऱ्या लाटेनं मुलांना कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण लवकर होऊ शकते हे दाखवून दिलं आहे”

 

प्रियांका गांधी पुढे म्हणतात, “विद्यार्थी आधीच प्रचंड तणावामध्ये आहेत.त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी घालून परीक्षा हॉलमध्ये बसण्याची अपेक्षा करणं हे असंवेदनशील आणि अन्यायकारक आहे. अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ते आधीच खूप साऱ्या तणावात आहेत. अनेक महिने निर्णय घेणं लांबवल्यानंतर या परीक्षा अशा काळात घेण्यामागचं कारण मला समजत नाहीये”.

 

प्रियांका गांधी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. “मी याआधीही हे सांगितलं आहे आणि आत्ता पुन्हा एकदा सांगते. मुलांचं मानसिक आरोग्य हे त्यांच्या शारिरीक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. आता वेळ आली आहे की आपल्या शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या भल्याकडे संवेदनशील दृष्टीने बघायला हवं आणि या समस्या गांभीर्याने घ्यायला हव्यात”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

 

 

Protected Content